वृत्तसंस्था/ अबु धाबी
अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात चालू महिन्यात अबु धाबीत होणाऱया वनडे मालिकेच्या वेळापत्रकामध्ये फेरबदल करण्यात आला असून दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळानी या निर्णयाला आपला दुजोरा दिला आहे.
अफगाण आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 18 जानेवारीपासून खेळविली जाणार होती पण आता या सामन्यांच्या तारखामध्ये फेरबदल करण्यात आला आहे. आता या मालिकेतील पहिला सामना 21 जानेवारीला अबु धाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळविला जाणार असून या मालिकेतील उर्वरित दोन सामने अनुक्रमे 24 आणि 26 जानेवारीला याच स्टेडियममध्ये होणार असल्याची माहिती आयर्लंड क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली.
अफगाण क्रिकेट मंडळाकडून या मालिकेच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्याची विनंती करण्यात आली होती. अफगाण क्रिकेट संघाच्या अबु धाबीतील आगमनाला थोडा विलंब होत असल्याने या फेरबदलाला आयर्लंड क्रिकेट मंडळाने मान्यता दिली. उभय संघातील ही वनडे मालिका आगामी विश्वचषक सुपरलीग मालिकेचा एक भाग आहे. संयुक्त अरब अमिरात आणि आयर्लंड यांच्यातील चार सामन्यांची वनडे मालिका अबु धाबीत शुक्रवारपासून सुरू होत आहे.