वृत्तसंस्था/ कराची
येत्या ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातमध्ये पाकविरूद्ध वनडे मालिकेचे यजमानपद स्वीकारण्यासाठी अफगाण क्रिकेट मंडळ इच्छूक असल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.
आयसीसी आणि आशिया क्रिकेट मंडळाच्या स्पर्धांमध्ये यापूर्वी पाक आणि अफगाण यांच्यात वारंवार सामने झाले आहेत पण आता वरिष्ठ पातळीवर पाक संघाबरोबर द्विपक्षीय वनडे मालिका खेळण्यासाठी अफगाण क्रिकेट मंडळाचे प्रयत्न चालू आहेत. या संदर्भात पाक आणि अफगाण क्रिकेट मंडळामध्ये लवकरच चर्चा केली जाणार आहे. अबु धाबी किंवा दुबईमध्ये उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अफगाणबरोबर ही द्विपक्षीय मालिका आयोजित करण्यासाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पीसीबीला सांगितले आहे.