वार्ताहर/ रामनगर
सरकारकडून सिलिंडरवर मिळणारी सबसिडी व सहाय्यधन बँक खात्यात जमा करण्यात आले होते. परंतु ही रक्कम ताबडतोब न काढल्यास पुन्हा सरकारला जमा होईल, अशी अफवा पसरल्याने येथील सिंडिकेट बँकेच्या आवारात रक्कम काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे निदर्शनास आले.
अनमोड, तिनईघाट, असू, जगलबेट, शिंगरगाव अशा अनेक खेडय़ातील खातेदारांची रक्कम रामनगरमधील एकमेव राष्ट्रीयकृत सिंडिकेट बँकेत सबसिडी रक्कम जमा झाली का, हे पाहण्यासाठी व रक्कम काढण्यासाठी खातेधारकांनी प्रचंड गर्दी केली. याबद्दल बँक व्यवस्थापकांना विचारणा केल्यावर ते म्हणाले की, एकदा खात्यात जमा झालेले पैसे पुन्हा वापस सरकारजमा होत नाही. ज्यांना खरोखरच पैशांची गरज आहे त्यांनी नियमांचे पालन करून पैसे काढण्यासाठी यावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. सदर अफवेमुळे कार्डधारक आपल्या खात्यात सिलिंडर सबसिडीचे 772 रु. जमा झाल्यास ती रक्कम आपल्या खात्यातून काढत आहेत. मात्र ही निव्वळ अफवा आहे. यावर विश्वास ठेवू नये, असे सांगण्यात आले..