येळळूर येथे सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी पकडले साप
प्रतिनिधी / येळ्ळूर
महाराष्ट्र हायस्कूल-येळ्ळूर परिसरात एकाच ठिकाणी तब्बल पाच साप आढळले. सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी हे सर्व साप पकडले आहेत. यामध्ये दोन नाग साप आहेत तर तीन धामण जातीचे साप आहेत. शाळा परिसरातच हे साप सापडल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एखादा साप दिसला तरी मनामध्ये धडकी भरते. मात्र, काही जणांना चार साप दृष्टीला पडले. त्यामध्ये दोन नाग आणि दोन धामण निदर्शनास आले. ते साप पकडत असताना त्याच ठिकाणी आणखी एक साप सापडला. एकूण पाच साप सापडले. साधारण पाच ते सहा वर्षे वयोगटातील दोन नाग साप असल्याचे आनंद चिठ्ठी यांनी सांगितले. तब्बल तीन तास लागून आनंद चिठ्ठी यांनी हे साप पकडले आहेत.
सर्पमित्र आनंद चिठ्ठी साप पकडण्यासाठी दाखल होताच त्या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. साप पकडून आनंद चिठ्ठी यांनी विद्यार्थ्यांना सापाविषयी माहिती दिली. धामण सापाचे खाद्य उंदीर आहे. त्यामुळे ते साप गावच्या परिसरात अधिक असतात, असे त्यांनी सांगितले. एकाच ठिकाणी पाच साप आढळल्यामुळे हा एक चर्चेचा विषय बनला आहे.