ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अबू धाबीची ‘मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी’ रिलायन्स जिओमध्ये 9093.60 कोटींची गुंतवणूक करणार आहे. लॉकडाऊन काळात जिओत गुंतवणूक करणारी ही सहावी कंपनी असेल. रिलायन्सने याबाबतची माहिती दिली आहे.
‘मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी’ ही अबू धाबीची सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 9,093.60 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीद्वारे कंपनी जिओमध्ये 1.85 टक्के हिस्सेदारी करेल. जिओ प्लॅटफॉर्मचा हा सहावा मोठा करार आहे.
यापूर्वी फेसबुक, सिल्वर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक आणि अमेरिकेन कंपनी ‘KKR’ ने जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. फेसबुकने 43,534 कोटींची गुंतवणूक करत जिओमध्ये 9.9 टक्के भागीदारी निश्चित केली आहे. तर सिल्वर लेकने जिओमध्ये 5655 कोटींची गुंतवणूक करत 1.55 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सनेही 11,367 कोटी, जनरल अटलांटिकने साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. तर ‘KKR’ ने 11 हजार 367 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या कंपनीची जिओमध्ये 2.23 टक्के भागीदारी असेल. या सहा कंपन्यांकडून जिओत एकूण 87,655 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.