दोन भारतीयांसह तीन ठार : विमानतळाजवळील तीन टँकरचा स्फोट
अबू धाबी / वृत्तसंस्था
संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी विमानतळाजवळ सोमवारी ड्रोन हल्ला करून मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर विमानतळाजवळील तीन टँकरचा स्फोट झाला असून त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे भारताचे राजदूत संजय सुधीर यांनी सांगितले. तसेच हा ड्रोन हल्ला असू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. ड्रोन हल्ल्यामुळे हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनीही व्यक्त केला आहे. दरम्यान, येमेनच्या हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
मुसाफा इंडस्ट्रियल एरियामध्ये तेलाच्या तीन टँकरचा स्फोट झाल्याचे अबू धाबी पोलिसांनी सांगितले होते. यानंतर अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामाच्या ठिकाणीही आग लागली. यासंबंधीचे व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यामध्ये धुराचे लोट दिसून येत होते. स्फोट होण्यापूर्वी आकाशात ड्रोनसारखी आकृती दिसली होती असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. विमानतळावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दल अधिकाऱयांचे पथक दाखल झाले होते. दोन्ही ठिकाणांवरील आग आटोक्मयात आणण्यात आली. तथापि, हवाई वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.
आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. याआधीही हुथींनी सौदी अरेबियावर अनेकदा असे हल्ले केले आहेत. मात्र आता त्याने युएईला लक्ष्य केले आहे. सौदी अरेबियातील तेल सुविधा आणि अनेक शहरांवर हुथींनी क्षेपणास्त्रे डागली आहेत. येमेन युद्धात सौदी अरेबियाने सहभाग घेतल्याने ते नाराज आहेत.
येमेनच्या हुथी बंडखोरांनी स्वीकारली जबाबदारी
येमेनमधील इराण समर्थित हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बंडखोरांनी स्वतः हल्ल्याची कबुली दिली आहे. सौदी अरेबियापाठोपाठ हुथी बंडखोरांनी युएईवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. यासंबंधीचा तपास सुरू ठेवत सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला आहे.