वार्ताहर / अब्दुल लाट
अब्दुल लाट परिसरात मिळालेल्या गोपनीय माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्री केंद्रावर छापे टाकून दोन वारस गुन्हे नोंद केलेले आहेत. हा छापा काळमवाडी वसाहत परिसर व गणेश मंदिर समोर, जावई नगर परिसर ठिकाणी मारण्यात आला. सदर गुन्ह्यामध्ये विदेशी मद्य 19.62 लिटर, देशी मद्य 79.38 लिटर, हातभट्टी 20 लिटर इत्यादी मुद्देमालासह दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आले असून सदर संयुक्त छापा कारवाईत एकूण रुपये 1 लाख 43 हजार 892 रुपयांच्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत प्रमोद हरी मिणेकर वर्ष 48 ,मनोज हरी मिणेकर वय 53, सुनील बाळू घोरपडे वय 43 हे तिघेही रा. अब्दुल लाट यांच्याविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या महिलावर्गाला जो त्रास होत होता, तो आता कमी होणार अशी चर्चा नागरिकांतून होताना दिसत आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरचे अधिक्षक गणेश पाटील, इचलकरंजीचे उपविभागीय दंडाधिकारी विकास खरात व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार आणि राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरचे उपअधिक्षक डी. आर. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यय निरीक्षक शिवाजी कोरे, सागर नलवडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. एस. हजारे, सुनील पाटील, सतीश कोळी, जवान विलास पवार, सुभाष कोले, विजय माने तसेच अब्दुल लाट गावचे पोलीस पाटील मानसिंग भोसले,कोतवाल बाळासो कोळी यांनी यामध्ये सहभाग घेतला. अब्दुल लाट परिसरामध्ये अशाप्रकारे अवैध मद्य निर्मिती, साठा, विक्री व वाहतूक आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई करून यापुढेही अशाप्रकारची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले आहे.