ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी आता अर्जुन रामपालच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आता अर्जुन रामपालच्या बहिणीला अंमलीपदार्थ विरोधी पथक अर्थात एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांना आज 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. NCBच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्ज केस कनेक्शन प्रकरणी तपास यंत्रणेने अर्जुन रामपालच्या बहिणीला समन्स बजावण्यात आले आहेत.
NCB कडून आतापर्यंत अभिनेता अर्जुन रामपालची दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात NCB ने अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकला होता. त्यावेळी अर्जुन रामपालच्या घरी NCBच्या अधिकाऱ्यांना NDPC ॲक्टनुसार प्रतिबंध असलेली औषधं मिळाली होती. अर्जुनने आपल्या एका नातेवाईकामार्फत बेकायदेशीरपणे ही औषधे घेतली होती. या औषधांसाठी ज्या प्रिस्क्रिप्शनचा वापर करण्यात आला होता ते एक्सपायर झाले होते.
अर्जुन रामपालने त्यावेळी सांगितले होते की, आपण NCB ला एक विशेष औषधांचे प्रिस्क्रिप्शनही दिले आहे. हे प्रिस्क्रिप्शन दिल्लीच्या मनोवैज्ञानिकाने आपल्याला दिल्याचे त्याने म्हटले होते.
दरम्यान, अर्जुन रामपालची 21 डिसेंबर रोजी तब्बल 6 तास चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी सुमारे 6 तास चालली. त्या दिवशी त्याला अटक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण चौकशीनंतर अर्जुनला सोडून देण्यात आले.