ऑनलाईन टीम /मुंबई :
देशभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. सामान्यांपासून ते मंत्री, नेते, अभिनेते सर्वच क्षेत्रातील लोकं या कोरोनाचे शिकार झाले आहेत. त्यातच आता अभिनेता आफताब शिवदासानीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
आफताब आपल्या पोस्टमध्ये म्हणाला की, मला आशा आहे की आपल्या सर्वांची प्रकृती ठीक असेल आणि आपण आपली नीट काळजी घेत असला. नुकतेच मला खोकला आणि थोडा ताप आला होता. त्यानंतर मी माझी कोरोनाची चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
पुढे तो म्हणाला, मी सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरामध्येच क्वारंटाइन झालो आहे. मागील काही दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतः ची चाचणी करून घ्यावी असे आवाहन ही त्याने यावेळी केले आहे.
तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादाने मी लवकरच बरा होईन. तसेच सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि आवश्यकतेनुसार सॅनिटायझर आणि सतत मास्क वापरावा कारण हेच आपले जीवन वाचवू शकतील, असेही यावेळी म्हटले आहे.
आफताबचे मस्ती, हंगामा, लव के लिये कुछ भी करेगा यासारखे चित्रपट हिट आहेत. यापूर्वी बीग बी अमिताभ बच्चन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, गायक एस पी बालसुब्रमण्यम आदींना कोरोनाची लागण झाली होती.