ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो 34 वर्षांचा होता. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.
एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांतसिंह राजपूत प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘क्या पो छे!’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित बायोपिक एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात त्याने महेंद्र सिंग धोनीची व्यक्तिरेखा साकारली होती.
याशिवाय सुशांतने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.