तब्बल 20 तासांहून अधिक वेळ पाहणी
प्रतिनिधी /मुंबई
बॉलिवूड अभिनेता व कोरोना प्रादुर्भावात अनेकांसाठी देवदूत ठरलेल्या सोनू सूदच्या घर आणि कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. बुधवारी पहाटे सुरु केलेली तपासणी तब्बल 20 तास चालू होती. यामुळे बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. घरातून काही दस्तावेज ताब्यात घेतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील कार्यालय, हॉटेल आणि घरासह 6 ठिकाणांची प्राप्तिकर विभागाने पाहणी झाली. 12 जणांच्या पथकाने ही तपासणी केली. या दरम्यान, सोनू सूदसह कुटुंबीयांचे सर्व फोन व संपर्क बंद करण्यात आले होते. ही कारवाई का झाली? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, सत्याच्या मार्गावर लाखो अडचणी येतात. पण विजय नेहमीच सत्याचा होतो. ज्या कुटुंबीयांना सोनू सूदनं अडचणींच्या काळात मदत केली, त्यांचे आशीर्वाद सोनू सूदबरोबर आहेत.
दरम्यान, कोरोना प्रादुर्भावात सोनू सूद अनेकांसाठी देवदूत ठरला होता. सोनूनं अनेकांना सढळ हातानं मदत केली होती. त्यामुळे लोकांनीही सोनूवर भरभरून प्रेम केलं. तसेच कोरोना काळात आपापल्या घरी परतणाऱया मजुरांनाही सोनूने आर्थिक मदत केली होती. तसेच मजुरांसाठी जेवण, बसची व्यवस्था यांसारख्या सोयीही पुरवल्या होत्या. यावरुन सोनू सुदवर कौतुकाचा वर्षावही केला जात होता. मात्र दुसरीकडे सोनूवर विविध आरोपही करण्यात येत होते.