ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सोनू सूदने आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. मात्र, ही भेट नेमकी कशासाठी होती हे अजून समोर आलेले नाही.
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने सोनू सूदचे निवासस्थान बेकायदा असल्याचे सांगत त्याला नोटीस बजावली आहे. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने शरद पवारांंची भेट घेतली. गेल्या आठवड्यात सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता, ज्याला बीएमसीने ऑक्टोबर 2020 मध्ये बजावलेल्या नोटीस आणि दिवाणी कोर्टाने बजावलेल्या आदेशाला आव्हान दिले होते.
‘बेकायदा बांधकामप्रकरणी अभिनेता सोनू सूदला वारंवार नोटीस बजावण्यात आली. कारवाई देखील करण्यात आली. मात्र तरी देखील सोनू सूदने कायद्याचे उल्लंघन करणे थांबवलेले नाही. त्यामुळे तो वारंवार कायदे मोडणारा गुन्हेगारच असल्याचा दावा’ बीएमसीने हायकोर्टात केला आहे. यासोबतच सोनू सूदला कुठलाही दिलासा देऊ नये अशी मागणी देखील केली आहे.
जुहू इथल्या शक्तीसागर या निवासी सहा मजली इमारतीचं हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. ही इमारत सोनू आणि त्याच्या पत्नीच्या मालकीची असल्याची कुठलीही कागदपत्रं नसल्याचे पालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.