हृदयविकाराच्या धक्क्याने बाथरुममध्ये कोसळले
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलगू चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन झाले आहे. 74 वर्षीय रेड्डी यांना आंध्रप्रदेशच्या गुंटूर येथील निवासस्थानी मंगळवारी सकाळी हृदयविकाराचा धक्का बसला होता. हृदयविकाराच्या धक्क्यानंतर रेड्डी बाथरुममध्ये कोसळले होते.
जयप्रकाश रेड्डी हे शिक्षक होते आणि त्यांना लहानपणापासूच अभिनयाची आवड होती. त्यांचा ‘ब्रह्म पुत्रुदु’ हा पहिला चित्रपट होता. परंतु त्यानंतर काही काळ त्यांना फारसे यश मिळू शकले नव्हते आणि याचमुळे त्यांनी पुन्हा अध्यापनाचे काम सुरू केले होते.
सुमारे एक दशकानंतर त्यांना पहिले मोठे यश ‘प्रेमिचुकंदम रा’ चित्रपटाद्वारे मिळाले. परंतु बालकृष्ण यांचा ‘समरसिन्हा रेड्डी’ हा चित्रपट त्यांच्या कारकीर्दीला नवे वळण देणारा ठरला. येथूनच त्यांनी खलनायकाच्या स्वरुपात ओळख तयार केली आहे. त्यांच्या अन्य चित्रपटांमध्ये नरसिंहा नायडू, आनंदम, निजाम, कबड्डी कबड्डी, चिन्ना, धरमपुरी, किंग, किक, बिंदास, गब्बर सिंग, लिजेंड, ब्रूस ली, द फायटर, नेनू राजू नेनू मंत्री आणि लव्हर्स सामील आहे.