‘सावरकर : काल, आज आणि उद्या’ विषयावर गुंफणार
कोल्हापूर प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळाच्या वतीने येत्या शनिवार 12 मार्च रोजी व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ‘सावरकर : काल, आज आणि उद्या’ या विषयावर सावरकर चरित्राचे गाढे अभ्यासक व प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी सायंकाळी 5 वाजता राम गणेश गडकरी सभागृह, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, पेटाळा येथे व्याख्यान होणार आहे. ही माहिती अध्यक्ष नितीन वाडीकर, उपाध्यक्ष श्रीरंग तथा एस. के. कुलकर्णी आणि कार्यवाह शालन शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लेखक, साहित्यिक, नाटककार, विज्ञानवादाचा पुरस्कर्ता, निस्सिम देशभक्त तसेच अनिष्ठ रूढी, परंपरा, जातीभेदाविरोधात लढणारा विचारवंत नेता असे असंख्य पैलू समाजापुढे आणून गेली आठ वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळ समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे. शाळा, महाविद्यालयात जागृती बरोबरच विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध आणि जलतरण स्पर्धांचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे दोन वर्षे या स्पर्धा खंडीत झाल्या होत्या. त्या पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यंदा 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या सावरकरांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून 12 मार्च रोजी योगेश सोमण यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, व्याख्यानाच्या वेळी मंडळाच्या सदस्य नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्यात येणार आहे. इच्छुकांनी मंडळाचे सदस्य होऊन प्रबोधनाच्या कार्याला बळ द्यावे, असे आवाहनही वाडीकर, कुलकर्णी आणि शेटे यांनी केले. यावेळी साईप्रसाद बेकनाळकर, उदय बेंडिगेरी, राजेंद्र शिंदे उपस्थित होते.