ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना विषाणूने देशात अक्षरशः थैमान घातले आहे. या विषाणूने कलाविश्वालाही या विळख्यात घेतले आहे. त्यातच आता 70 आणि 80 च्या दशकात अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते रणधीर कपूर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, रणधीर कपूर यांना मधुमेहाचा देखील आजार आहे. रणधीर कपूर यांना व्ही.आय.पी वॉर्डमध्ये दाखल केले असून डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहे.
रुग्णालयाचे सिईओ डॉ. संतोष शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाच्या उपचारासाठी काल रात्री कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, रणधीर कपूर यांनी 50 च्या दशकात ‘श्री 420’ (1955) आणि ‘दो उस्ताद’ (1956) बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. 1971 ला रणधीर कपूरने ‘कल आज और कल’ या चित्रपट अभिनेता म्हणून काम केले. वडील राज कपूर आणि आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत रणधीर कपूर यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता.