प्रतिनिधी / सातारा
कृष्णानगर येथे दि. 16 रोजी घडलेल्या 65 वर्षीय महिलेच्या खुनाच्या छडा लावण्यात सातारा पोलीस दलाला यश आले असून याप्रकरणी अनंत दाजिबा पेंडणेकर (वय 33, सध्या रा. विक्रांतनगर, संभाजीनगर, सातारा, मूळ रा. मावेली, ता. चंदगड) याला पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंध न ठेवल्यास तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिल्याने पेडणेकर याने जया गायकवाड-पाटील यांचा चाकूने वार करुन खून केल्याची कबुली दिलीय. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावणीत आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यानजिक शिवतेज हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बंसल यांनी ही माहिती दिली. यावेळी अपर जिल्हा अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक दलाल, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे उपस्थित होते.
कृष्णानगरमधील गजानन हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या जया गायकवाड यांचा खून झाल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी काहीच पुरावा हाती न आल्याने नेमका मारेकरी कोण, कोणत्या उद्देशाने त्याने खून केला याचा तपास करण्याचे आव्हान सातारा शहर पोलिसांसमोर होते. मात्र, ते शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मछले, डीबीचे उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने या खुनाचा छडा लावण्यात यश आले. हे सर्व अधिकारी व तपास पथकातील कर्मचाऱयांचे एसपी बंसल यांनी यावेळी अभिनंदन केले.
अज्ञाताने गायकवाड यांच्या गळयावर धारधार शस्त्राने वार केला होता. एसपी बंसल यांनी त्याचा छडा लावण्याच्या सूचना केल्यावर पोलीस निरीक्षक मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांचे पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, घटनास्थळी यातील अज्ञात आरोपीने कोणताही प्रकाराचा पुरावा ठेवला नसल्याने आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे होते.
उपनिरीक्षक कदम व पथक यांनी घटनास्थळावरुन मिळाले माहितीचे बारकाईने विश्लेषण करुन व मयताचे नातेवाईकांकडे केले चौकशीवरुन प्राप्त माहितीचा पाठपुरावा करत अतिशय क्लिष्ट अशा गुंतागुतीच्या परिस्थितीत पोलीस कौशल्य व अनुभव पणाला लावला. समोर आलेल्या दुव्यांवर त्यांनी आनंद दाजी पेडणेकर याला विक्रांतनगर, संभाजीनगर परिसरातून ताब्यात घेवून चौकशी सुरु केली. सुरवातीला पोलिसांना गुंगारा देवून पेडणेकर जुजबी उत्तरे देत होता. त्याला विश्वासात घेवून गुन्ह्याबाबत तपास करताना चौकशीत त्याने सदरचा खून केल्याची कबुली दिल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या व अत्यंत गंभीर व क्लिष्ट अशा खूनाचा गुन्हा उघडकीस आला आहे.
पाच दिवसात लावला खुनाचा छडा पेंडणेकर याला गुन्ह्यात अटक करुन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आलेले आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एम. मछले व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, संदीप आवळे, कॉन्स्टेबल गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग व विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला. |
कॉल रेकॉर्डवरुन गुन्हेगाराचा माग या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीने कसलाही पुरावा मागे ठेवला नव्हता. खून झालेल्या जया गायकवाड यांचा मोबाईलही अद्याप गायबच आहे. मात्र, मोबाईल कॉल रेकॉर्डवरुन संशयितांचा माग काढत तपास शेवटी पेडणेकर याच्यापर्यंत पोहोचले आणि या घटनेचा पर्दाफाश झाला. अनेक अंगानी तपास करताना पोलिसांनी सलग पाच दिवस परिश्रम घेतले आणि आरोपीला जेरबंदही केले आणि गेली पाच दिवस सुरु असलेल्या खुनाच्या घटनेच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. |
जया गायकवाडकडून बदनामीची धमकी एक महिन्यापूर्वी प्रवासात जया गायकवाड व अनंत पेडणेकर यांची चंदगढच्या प्रवासात ओळख झाली. त्यातून मग मोबाईल क्रमाकांची देवाणघेवाण झाल्यावर त्यांच्या शारीरीक संबंध सुरु झाले. मात्र हे संबंध आयुष्यातूनच उठवतील याची कल्पना दोघांनाही नव्हती. अनंतचे लग्न झाले होते. मात्र जया त्याला संबंध ठेवण्यासाठी मजबूर करत होते. माझ्याकडेच रहा व संबंध ठेव अन्यथा तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिल्याने शेवटी अनंतने त्यांचा खून केल्याची माहिती तो देत आहे. |