ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. बुधवारी पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास राज यांचे कार्डिॲक अरेस्टने निधन झाले.
फोटोग्राफर विरल भयानी यांनी राज कौशल यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज कौशल यांच्या कुटुंबाचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ‘मंदिरा बेदी यांचे पती आणि अॅड फिल्ममेकर राज कौशल यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या बातमीने आम्ही सारेच धक्क्यात आहोत.
राज यांनी अभिनेता म्हणून करिअरची सुरूवात केली होती. मात्र नंतर ते दिग्दर्शनाकडे वळले. त्यांनी ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ या तीन चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. तर माय ब्रदर निखिल, शादी का लड्डू आणि प्यार में कभी-कभी या सिनेमांची निर्मितीही त्यांचीच होती. राज कौशल यांच्या निधनाने बॉलिवूडमधील दिग्गजांनीही शोक व्यक्त केला आहे.
- मंदिरा बेदीसोबत विवाह
1999 मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचा विवाह झाला होता. दोघांचे लव्ह मॅरेज होते. 2011 मध्ये त्यांचा मुलगा वीर कौशलचा जन्म झाला. तर गेल्याच वर्षी त्यांनी चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले होते. तिचे तारा बेदी कौशल असे नामकरण करण्यात आले होते.
दरम्यान, रविवारी मंदिरा आणि राज यांनी एका गेट-टुगेदरचे आयोजन केले होते. या पार्टीला नेहा धुपिया, अंगद बेदी, सागरिका घाटगे, झहीर खान, आशिष चौधरी आणि त्यांची पत्नी यांनी हजेरी लावली होती.