प्रतिनिधी/ बेंगळूर
कन्नड सिनेसृष्टीतील ड्रग्ज प्रकरणी कारागृहात असलेल्या अभिनेत्री रागिणी द्विवेदीला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश आर. एफ. नरीमन यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा आदेश दिला आहे. ड्रग्ज माफियांशी संपर्क आणि ड्रग्ज सेवनप्रकरणी रागिणी द्विवेदीला 4 सप्टेंबर 2020 रोजी अटक करण्यात आली होती. 140 दिवसांनंतर तिची बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहातून शुक्रवारी सुटका होईल.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज माफियांच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून अभिनेत्री रागिणी द्विवेदी, संजना गल्रानी, आदित्य अल्वा याच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी संजनाला 11 डिसेंबर रोजी आजारी असल्याने उपचारासाठी जामीन मंजूर केला होता. आता रागिणीलाही जामीन मिळाला आहे. यापूर्वी बेंगळूरचे सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने तिच्या जामीन याचिका फेटाळल्या होत्या. त्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
बेंगळूरमधील पंचतारांकीत हॉटेल, पब व फार्म हाऊसमध्ये पाटर्य़ांमध्ये ड्रग्ज पुरवठा होत असल्याने सीसीबी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून 18 हून अधिक जणांना अटक केली होती. गोवा, पंजाब, महाराष्ट्र व इतर राज्ये तसेच विदेशातून अवैध मार्गाने कोकेन, एमडीएमए व इतर अमली पदार्थ मागविण्यात येत होते. पाटर्य़ांमध्ये सहभागी होणाऱयांना त्याचा पुरवठा केला जात होता, अशी माहिती उपलब्ध झाल्यानंतर अनेकांना अटक करण्यात आली होती.