ऑनलाईन टीम / पणजी :
मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील आणि गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचेे मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. आमदार आणि मंत्री म्हणून ते परिचयाचे आहेत. ते मगो पक्षाचे नेते होते. स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते.
मिळालेल्या माहितीनुसार, उसगावकर हे मिरामार येथे राहत होते. वृद्धापकाळाने अलिकडे ते आजारी होते. त्यांची प्राणज्योत मालवल्याचे कळताच गोव्यातील विविध समाज घटकांत दु:ख व्यक्त झाले. गोव्याची पोर्तुगीज राजवटीतून 1962 साली मुक्तता झाली व मग महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेचा काळ सुरू झाला. हा पक्ष सतरा वर्षे सत्तेत होता.
आमदार व मंत्री म्हणून सत्तरच्या दशकात उसगावकर यांनी भरपूर लोकोपयोगी कामे केली. प्रथम भाऊसाहेब बांदोडकर व मग भाऊंची कन्या स्वर्गीय शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर मंत्री होते. दरम्यान, दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.