दृश्यम या चित्रपटात दिसून येणारी अभिनेत्री श्रिया सरन गरोदर असल्याबद्दल अनेक अफवा सुरू होत्या. पण अभिनेत्रीने स्वतःच या अफवांना रोखले आहे. तिने सोशल मीडियावर एक पेमळ चित्रफित शेअर केली आहे. याचबरोबर तिने याद्वारे एक गुपित उघड केले आहे. श्रिया मागील वर्षी आई झाली होती, पण तिने आता हे चाहत्यांसोबत उघड केले आहे.
चित्रफितीत श्रिया पती आणि मुलीसोबत दिसून येते. 2020 या वर्षात माझे क्वारेंटाइन अत्यंत सुंदर राहिले. सर्व जगात एका वेगळय़ा प्रकारची उलथापालथ होत असताना आमचे जग बदलले होते. आमचे जीवन ऍडव्हेंचर, उत्सुकता आणि शिकवणींनी भरलेले राहिले. आम्हाला याचदरम्यान भेटीदाखल एक सुंदर परी मिळाली आहे. आम्ही देवाचे आभार मानतो असे तिने कॅप्शनमध्ये नमूद पेले आहे.
2018 मध्ये श्रियाने एंड्रीसोबत राजस्थानात विवाह केला होता. श्रिया पतीसोबत स्पेनमधील बार्सिलोना येथे राहते. पण 2020 मध्ये तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. मातृत्वानंतरचे जीवन श्रिया सध्या अनुभवत आहे.
श्रिया दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहे. 2001 मध्ये तिने कारकीर्दीस प्रारंभ केला होता. तुझे मेरी कसम हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता. 2007 मध्ये ती आवारापन या चित्रपटात दिसून आली होती. पण तिला खरे यश दृश्यम या चित्रपटामुळे प्राप्त झाले होते. लवकरच ती आरआरआर या चित्रपटात दिसून येणार आहे.