राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी पुरस्कार स्वीकारला
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या 80वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकूण ६ पुरस्कार मिळाले. कार्यक्रमात राज्यात प्रदेश कार्यालयकडून घेण्यात आलेल्या अभिप्राय नोंदणी अभिनव उपक्रमात राज्यातील एकूण शहर व जिल्ह्याच्या ७२ युनिटपैकी उत्कृष्ठ क्रमांकाचा ३ रा पुरस्कार सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या फादर बॉडीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांना देण्यात आला.
आज शनिवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सोलापूरला हा पुरस्कार देण्यात आला.
राज्यातील राष्ट्रवादीच्या इतर फ्रंटल संघटना आणि सेलच्या अभिप्राय नोंदणीमधून सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेवादलला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा, सोशल मीडिया सेलला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा, वकील सेलला पहिल्या क्रमांकाचा, कामगार सेलला पहिल्या क्रमांकाचा आणि व्हीजेएनटी सेलला देखील राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. हे पुरस्कार सेवादल शहर अध्यक्ष चंद्रकांत पवार, जिल्हाध्यक्ष विलास चेळेकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, शहर अध्यक्ष प्रमोद भोसले, कार्याध्यक्ष युवराज माने, वकील सेल जिल्हाध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव, कामगार सेलचे शहराध्यक्ष गोवर्धन संचू, व्हीजेएनटी सेल रुपेश भोसले, जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण यांनी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते स्वीकारले.
यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य विधान परिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष हरिभाऊ झिरवळ, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार प्रफुल पटेल, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, खासदार सुनील तटकरे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान आदी मान्यवर उपस्थित होते. तर मंचासमोरील सभागृहात ज्येष्ठ नेते माजी आजी आमदार खासदार, सर्व फ्रंटल व इतर सेलचे प्रदेशाध्यक्ष यांची देखील उपस्थिती होती.