संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून : काँग्रेससह 17 विरोधी पक्षांनी थोपटले दंड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सदनांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या या अभिभाषणावर काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, अकाली दल, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आदी 17 पक्ष बहिष्कार टाकणार आहेत. या पक्षांकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसचे वरि÷ नेते गुलाम नबी आझाद यांनी यासंबंधी बोलताना अधिकृत पत्रक जारी करणार असल्याचेही स्पष्ट केले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवार, 29 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. या अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी परंपरेप्रमाणे राष्ट्रपती संयुक्त सदनासमोर भाषण करतील. त्यात सरकारच्या भावी योजनांचा आणि आधीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येतो. या अभिभाषणात पहिल्यांदाच दोन्ही सदनाचे सदस्य ‘सेंट्रल हॉल’ऐवजी लोकसभा आणि राज्यसभेतच बसणार आहेत. सोमवारी, 1 फेबुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यानंतर पुढे काही दिवस अर्थसंकल्पावर चर्चा होणार असून महत्त्वाच्या विधेयकांसह कामकाजाला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. त्यानंतर पूर्वनियोजनाप्रमाणे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांचे कामकाज सुरू होईल.
एकवटलेले विरोधक…
राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेकेएनसी, द्रमुक, एआयटीसी, शिवसेना, समाजवादी पार्टी, आरजेडी, सीपीआयएमएल, सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, पीडीपी, एमडीएमके, केरळ काँग्रेस, एआययुडीएफ आणि आम आदमी पार्टी.