डेहराडूनमधील गरजू लोकांच्या अन्नधान्याची केली सोय, पोलिसांकडे सोपवली मदत
वृत्तसंस्था/ डेहराडून
देशातील कोरोनाचे संकट टाळण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हातावरचे पोट भरणाऱया कामगारांचे मोठे हाल होत असून अशा लोकांसाठी अनेक हात पुढे येत आहेत. पश्चिम बंगाल संघाचा कर्णधार अभिमन्यु ईश्वरनने डेहराडूनमधील गरजू लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
डेहराडून शहरात अडकलेल्या अन्य राज्यातील कामगारांची स्थिती बिकट आहे. या लोकांना शहरातील काही सामाजिक संस्थामार्फत अन्नाची पाकिटे दिली जात आहेत. या लोकांच्या मदतीसाठी अभिमन्यूने 2.5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत त्याने पोलिसांकडे सोपवली. डेहराडूनमधील पोलिसांकडे मी 2.5 लाख दिले आहेत. जे मजूर अडकले आहेत त्यांना मदत होईल. त्यांच्या अन्न-धान्याची सोय होऊ शकेल, असे अभिमन्यूने म्हटले आहे. आम्ही 100 हून अधिक लोकांच्या घरी रेशन पोहोचवले आहे. तसेच इतर नागरिकांनाही गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्याने केले आहे.
अभिमन्यूपूर्वी देशातील अनेक क्रिकेटपटूंनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहायता निधीला मदत केली आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे.