अभिषेक बच्चन आणि यामी गौतम यांच्या ‘दसवी’ या चित्रपटाचा टीझर सादर करण्यात आला आहे. यासंबंधीची माहिनी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. ‘तुम्ही दसवीच्या गंगारामपेक्षा अधिक तयार असाल अशी अपेक्षा करते. बेस्ट ऑफ लक दसवीचे विद्यार्थी. दसवी 7 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल’ असे त्यांनी म्हटले आहे.
तुषार जलोटा यांच्या दिग्दर्शनाच्या अंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटात अभिषेक बच्चन हा प्रभावशाली नेता गंगाराम चौधरी यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रपटात याचबरोबर अभिनेत्री यामी गौतम एका पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारत आहे. तसेच अभिनेत्री निमरत कौर देखील चित्रपटात दिसून येणार आहे. निमरत यात राजकीय नेत्या विमला देवी यांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान यांची मॅडॉक फिल्म्स आणि जियो स्टुडिओकडून करण्यात आली आहे.
अभिषेक लवकरच आर. बाल्की यांच्या चित्रपटात क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटात सैयामी खेर आणि शबाना आझमी देखील मुख्य भूमिकेत आहेत. तर अनुराग कश्यप यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या गुलाब जामुनमध्ये देखील अभिषेक काम करत आहे. या चित्रपटात तो ऐश्वर्या रायसोबत दिसून येणार आहे.