प्रतिनिधी/कोल्हापूर
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) कोल्हापूर केंद्रातर्फे गुरुवारी जगन्नाथ रथयात्रा महोत्सव 2020 उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवांतर्गत दसरा चौक ते हरी ओम नगरमधील इस्कॉन मंदिरापर्यंत रथयात्रा, प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रथयात्रेसाठी कोल्हापूरसह मुंबई, पुण्यासह कर्नाटकातूनही हजारो भक्त सहभागी झाले होते.
जगन्नाथ रथयात्रेला दसरा चौकातून दुपारी साडेतीन वाजता प्रारंभ झाला. हजारो भक्तांनी दोराच्या सहाय्याने रथ ओढत हरी ओम नगरमधील इस्कॉन मंदिरापर्यंत नेला. रथयात्रा दसरा चौक, शाहू टॉकीज, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाव्दार रोड, ताराबाई रोड, रंकाळा टॉवर, शालिनी पॅलेस, हरी ओमनगर इस्कॉन मंदिर अशी काढण्यात आली. यात्रामार्गावर भक्तांनी हरे कृष्ण हरे कृष्ण…, हरे राम हरे राम राम राम हरे हरे… असा जयघोष केला.
बैलगाडी, ट्रक्टर्स ट्रॉलीमध्ये श्री कृष्णाचा चैतन्य महाप्रभू यांचा अवतार, त्यांचा भक्तिमार्ग, ज्ञानजनजागृती संदेश देणारे डिजिटल फलक उभारले होते. रथयात्रा सुमारे 5 तास चालली होती. भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.