जिल्हाधिकाऱयांनी दिले आदेश : परिसरातील व्यवहार राहणार पूर्ण बंद
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावात शुक्रवारी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. कॅम्पमधील 3 तर अमननगर आणि संगमेश्वरनगरजवळील आस्मा कॉलनीतील एक रुग्ण आढळला. त्यामुळे बेळगावात खळबळ उडाली. हे रुग्ण आढळताच त्या परिसरात दक्षतेचे आदेश बजावण्यात आले. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱयांनी अमननगर आणि संगमेश्वरनगर परिसर निर्बंधित प्रदेश म्हणून घोषित केले आहेत. यापूर्वीच कॅम्पला निर्बंधित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या परिसरात रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हा परिसर सीलबंद केला. त्याचबरोबर आरोग्य विभागालाही या नगरांमधील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. निर्बंधित प्रदेश घोषित केल्यानंतर या परिसरातील 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
आरोग्य अधिकाऱयांनी आता जातीने लक्ष देऊन कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वारंटाईनमध्ये दाखल करावे. याचबरोबर या परिसरात सर्दी, ताप, खोकला किंवा इतर आजार झालेला रुग्ण आढळल्यास त्याची माहिती घेऊन तपासणी करावी, असे सांगण्यात आले.
जनतेनेही सामाजिक अंतर ठेवूनच आपले व्यवहार करावेत. घरातून कोणीही बाहेर पडू नये, याचबरोबर कोणीही संशयित रुग्ण आढळल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिली आहे.