क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
एफसी गोवाने आपल्या उर्वरित आयएसएल स्पर्धेसाठी भारताचा आंतरराष्ट्रीय मीडफिल्डर 20 वर्षीय अमरजीत सिंग कियाम याच्याशी करार केला आहे. मणिपूरचा या फुटबॉलपटूने पाच वेळा भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
अमरजीत सिंगचा 2017 साली झालेल्या फिफाच्या 17 वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघात समावेश होता. 2017-18 फुटबॉल मोसमात त्याने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत इंडियन ऍरोज संघाचे कप्तानपद भुषविले. त्यानंतर तो 2019-20 आयएसएलच्या मोसमात जमशेदपूर एफसी संघात होता. एक मोसम जमशेदपूर संघाशी झाल्यानंतर तो ऑन-लोनवर परत एकदा इंडियन ऍरोजशी आला.
गेल्या आयएसएल फुटबॉल मोसमात त्याने 15 वेळा जमशेदपूरचे प्रतिनिधीत्व करताना आपण एक उत्कृष्ट मीडफिल्डर असल्याचे सिद्ध केले. मध्यरक्षक लॅनी रॉड्रिग्सने एफसी गोवा संघाला सोडचिठ्ठी दिली आहे. भारताच्या राष्ट्रीय संघाचा सदस्य असलेला लॅनी हा 2018 साली एफसी गोवा संघात दाखल झाला होता.
एफसी गोवा संघाकडून त्याने 51 सामने खेळताना दोन गोल आणि एक असिस्ट अशी कामगिरी केली आहे. 2019 साली सुपर कप जिंकलेल्या एफसी गोवाचा तो अविभाज्य घटक होता. मागील मोसमात संघाला साखळी फेरीत अव्वल स्थान मिळवून देण्यातही त्याचे योगदान होते. मोसमातील मध्यावर झालेल्या ट्रान्सफर विंडोमध्ये लॅनी रॉड्रिग्सला एटीके मोहन बागानने करारबद्ध केले आहे. ग्लॅन मार्टिंन्स हा एटीके मोहन बागानचा मीडफिल्डर आता एफसी गोवाकडे आला आहे. ग्लॅनला यंदाच्या आयएसएल मोसमात एटीकेएमबीकडून केवळ सात सामने खेळण्याची संधी मिळाली. एफसी गोवाशी करार केलेला ग्लॅन मार्टिंन्स चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लब आणि स्पोर्टिंग क्लुब दी गोवाकडूनही खेळला आहे.