@ श्रीनगर / वृत्तसंस्था
जून-ऑगस्टदरम्यान होणाऱया अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये यात्रेत सहभागी होण्यास इच्छुक असणाऱया भाविकांनी आपल्या अर्जासोबत सर्व आवश्यक माहिती तपशील, फोटो आणि सोबत एक वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे अपेक्षित आहे, अशी माहिती अमरनाथ श्राईन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीतिश्वर कुमार यांनी दिली. अमरनाथ यात्रेसाठी भाविक अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन घरबसल्याच नोंदणी करु शकणार आहेत. यात्रेसाठी 13 वर्षांहून कमी आणि 75 वर्षांहून जास्त वय असणाऱया भाविकांना नोंदणी करता येणार नाही.
यंदा 28 जूनला सुरू होणारी ही यात्रा 22 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जवळपास 56 दिवसांसाठी सुरू असणारी ही यात्रा यंदाच्या वषी दोन्ही मार्गांनी एकाच दिवशी सुरू होणार आहे. अमरनाथ श्राईन बोर्डाला यंदाच्या वषी यात्रेसाठी 6 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. मागील वषी कोरोना विषाणूच्या संकटामुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संपूर्ण यात्राकाळात फक्त सांकेतिक पूजाअर्चा पार पडली होती.
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचे सल्लागार बसीर अहमद खान यांनी गांदरबलचा दौरा करत नुकतीच यात्रेच्या तयारीची पाहणी केली. गांदरबलचे उपजिल्हाधिकारी यांना यात्रेसाठी आवश्यक असणाऱया सर्व तयारीमध्ये हातभार लावत आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सदर यात्रेसाठी वीजपुरवठा, पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, नियंत्रण कक्ष, भाविकांच्या छावण्या, आपत्ती व्यवस्थापन, अन्नपुरवठा, स्वच्छता या सेवांबाबतची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले.