ऑनलाईन टीम / अमरावती :
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यातच महाराष्ट्रात तर दिवसेंदिवस रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये करोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीमवर आज (गुरुवार) अमरावतीमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती देताना अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले की, हा लॉकडाऊन शनिवार दि. 20 फेब्रुवारी रात्री 8 वाजेपासून रविवारी (दि. 21) संपूर्ण दिवस व सोमावरी ( दि 22) सकाळी 7 वाजेपर्यंत राहणार आहे.
या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व बाबी बंद असणार आहेत. संपूर्ण अमरावती जिल्हा एका दिवसासाठी ठप्प करण्यात आलेला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.