शिवसेनेची जिल्हा पोलीसप्रमुखांकडे मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून अमली, नशेली पदार्थांचा व्यापार आणि व्यापार करणार्यांचा जोर वाढू लागला आहे. शाळा-कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. चंदगडमध्ये मुंबई पोलीस क्राईम ब्रँचने एका फार्महाऊसवर छापा टाकून अमली पदार्थांचा साठा जप्त केला असेल तर हा चंदगड पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचा निष्काळजीपणा म्हणावा लागेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी करून दोषी अधिकार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून शिवसेनेने जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांच्याकडे सोमवारी केली.
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, नरेश तुळशीकर, राजेंद्र पाटील, अवधूत साळोखे, मंजित माने, संजय जाधव, राजू जाधव, संजय स्वामी, नितीन पाथरवट, अभिजीत बुकशेट यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांना निवेदन दिले.
कमी वेळेत भरमसाठ पैसे मिळविण्याच्या उद्देशातून किंवा धर्मांध शक्तीकडून अशा पद्धतीचा घातक व्यवसाय कोल्हापुरात सुरू आहे. विशेषत: चंदगड हे अमली पदार्थांच्या व्यवसायासह गोव्यातून चोरटी दारू आणून साठवणुकीचे केंद्र बनले आहे. ज्या भागात अमली पदार्थ सापडतील, त्या भागातील संबंधित पोलीस अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
अमली पदार्थ व चोरटी दारू रेखण्यासाठी पोलीस उपाधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क खात्यातील वरिष्ठ अधिकारी, गुन्हा अन्वेषण शाखेमधील वरिष्ठ अधिकार्यांचे विशेष पथ नेमावे, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल, गगनबावडा येथे पोलीस व एक्साईज खाते यांचे संयुक्त तपासणी नाके कार्यरत करावे, अशा मागण्या यावेळी केल्या.