माजी मंत्री मजीठिया भूमिगत – पंजाब पोलिसांची सुरक्षा नाकारली
वृत्तसंस्था/चंदीगड
पंजाबच्या राजकारणात नवा धमाका झाला आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने सोमवारी मध्यरात्री अकाली दलाचे नेते आणि माजी मंत्री विक्रम मजीठिया यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. हा गुन्हा मोहालीत ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने नोंदविला आहे. मजीठिया यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा नोंद झाला आहे.
मजीठिया यांना अटक केली जाईल. अमली पदार्थ विकणाऱयांना अटक होत असेल तर मजीठिया यांनाही पकडले जाईल असे विधान गृह विभागाची जबाबदारी असणारे उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा यांनी केले आहे. सूत्रांनुसार अकाली दलाला मजीठिया यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला जाण्याचा अगोदरच सुगावा लागला होता. मजीठिया भूमिगत झाल्याची चर्चा आहे. ते पंजाबबाहेर गेल्याचे बोलले जात आहेत. त्यांनी पंजाब पोलिसांऐवजी केवळ केंद्रीय सुरक्षा दलांच्या जवानांना सोबत नेल्याचे समजते.
49 पानी एफआयआर
मजीठिया यांच्या विरोधात 49 पानांचा एफआयआर नोंदविला गेला आहे. त्यांनी स्वतःची मालमत्ता तसेच वाहनांद्वारे अमली पदार्थ तस्करीत मदत केल्याचा आणि ते विकण्याकरता आर्थिक मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच अमली पदार्थ तस्करीचा पूर्ण कट रचल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मजीठिया यांच्या अमृतसर येथील घरी विदेशातून येणारे एनआरआय राहत होते. तेथे त्यांना वाहन आणि गनमॅन देखील पुरविला जात होता असा आरोप आहे. हा गुन्हा अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपींच्या जबाबावर नोंद करण्यात आला आहे.
सिद्धू यांच्याकडून आरोप
स्पेशल टास्क फोर्सच्या अहवालाच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. हा अहवाल 2018 मध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक हरप्रीत सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला होता. अहवालात मजीठिया यांचा उल्लेख असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी अनेकवेळा केला आहे.
राजकीय सूडातून कारवाई: अकाली दल
मजीठिया यांना जाणूनबुजून अडकविले जात आहे. चन्नी सरकारकडे कुठलाच मुद्दा नसल्याने नवा वाद निर्माण केला जातोय असा दावा अकाली दलाचे नेते विरसा सिंह वल्टोहा यांनी केला आहे.