काँग्रेसची जोरदार टीका
प्रतिनिधी / पणजी
अमली पदार्थ व्यवहार हा भाजपचा कौंटुबिक व्यवसाय झाल्याची टीका काँग्रेसने केली आहे. वागातोर रेव्ह पार्टीत सापडलेल्या कपिल झावेरी या अभिनेत्याचे सोशल मीडियावर प्रसारित झालेली छायाचित्रे तेच दर्शवत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याचे स्पष्टीकरण द्यावे, राजकारणी, पोलीस व अभिनेता यांच्या सेटींगमधून रेव्ह पार्टी, अमली पदार्थ धंदा खुलेआम चालू असल्याचे समोर आले असून त्यात अपयशी ठरलेल्या डॉ. सावंत याना सत्तेवर रहाणाऱयाचा अधिकार नाही. भाजपचे मंत्री, पदाधिकारी यांच्या आशीर्वादाने हे धंदे मुक्तपणे चालू असल्याचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नमूद केले.
पणजीत काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसचे सरचिटणीस व कळंगूटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी त्यांच्या भागात शुक्रवार, शनिवार, रविवार रेव्ह पार्टी धुडगूस सातत्याने चालू असतो, असे निदर्शनास आणले. रशीयन एजन्सीकडून त्यासाठी रशियन मुली पुरवल्या जातात. आताचे तेथील आमदार, मंत्री तेव्हा ड्रग्ज विरोधात मोठय़ा बाता करत होते. आता मात्र त्यांचे तोंड गप्प आहे. कपिल झवेरीचे फेसबूक व इतर माध्यमातील काही पोस्ट फर्नांडिस यांनी सादर केले. त्यात तो भाजप वाल्यांचे आभार मानताना दाखवण्यात आल्याचे फर्नांडिस यांनी निदर्शनास आणले. बांबोळी येथे हर्षद मोदी यांना 94 भूखंड करण्यासाठी बेकायदेशीरपणे मान्यता देण्यात आली असून सरकारने चौकशी न केल्यास हे प्रकरण दक्षता खात्याकडे नेण्याचा इशारा चोडणकर यांनी दिला आहे. या प्रकरणात रु. 35 लाखाचा तसेच 3 भूखंडाचा भ्रष्टाचारी व्यवहार झाल्याचा दावा चोडणकर यांनी केला. सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सि सिल्वेरा हे भाजपात गेले ते या मोदी प्रकरणात गप्प आहेत. याचा अर्थ त्यांचाही त्यात हात असल्याचा आरोप तेथील काँग्रेस गटाध्यक्ष टोनी फर्नांडिस यांनी केला. रस्ते करण्यासाठी कंत्राटदार पैसे घेण्यात येतात, असेही ते म्हणाले.