नव्या बांधकामावरील साहित्य पळविले
प्रतिनिधी/ बेळगाव
अमाननगर येथील एका नव्या बांधकामाचा दरवाजा फोडून चोरटय़ांनी साहित्य पळविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
नूरअहम्मद मुजावर यांच्या मालकीच्या बांधकामावर ही घटना घडली आहे. लॉकडाऊनमुळे सध्या काम बंद होते. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे पुन्हा घरची कामे सुरु करण्यासाठी नूरअहम्मद यांनी गवंडी कामगारांना घेऊन बांधकामवर पोहोचले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
दरवाजाला लावलेले कुलुप तोडून लोखंडी ग्रील, लोखंडी बार, सिमेंट व बोरव्हेलमध्ये सोडण्यात आलेली मोटार चोरटय़ांनी पळविली आहे. माळमारुती पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.