ऑनलाईन टीम / मुंबई :
संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस भारतात देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाग्रस्तांची संख्या हजारच्या वर पोहचली आहे. त्यातच आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही कोरोनाची टेस्ट करून घेतली आहे.
सुदैवाने अमित देशमुख यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. खोकला, ताप आल्याने अमित देशमुख यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन वैद्यकीय शिक्षा संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोनाची चाचणी करून घेतली.
अमित देशमुख म्हणाले, मी वैद्यकीय मंत्री असल्याने आपल्याला लागण झाल्यास इतरांनी प्रादुर्भाव होऊ नये, कुटुंबीयांना त्रास होऊ नये म्हणून मी टेस्ट करून घेतली.
पुढे ते म्हणाले, आता माझी प्रकृती ठीक आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. अजून चार दिवस मी घरातूनच काम करणार आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कार्यालयातून काम करेन, असं ही त्यांनी यावेळी सांगितले.