गव्हर्नर्स चषक मुष्टियुद्ध स्पर्धेत झोइरोव्हकडून पराभव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा बॉक्सर अमित पांघलला (52 किलो) रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या गव्हर्नर्स चषक मुष्टियुद्ध स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत त्याला वर्ल्ड चॅम्पियन शाखोबिदिन झोइरोव्हकडून पराभव पत्करावा लागला.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविणाऱया अमितला उझ्बेकच्या झोइरोव्हकडून 5-0 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. झोइरोव्ह हा विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियनही आहे. 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही अमितला झोइरोव्हकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी अंतिम फेरीत झोइरोव्हने अमितला हरविले होते. दोन्ही मुष्टियोद्धे टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातील बल्गेरियात झालेल्या स्ट्रँडजा मेमोरियल स्पर्धेत भारताच्या दीपक कुमारने झोइरोव्हला हरविले होते.
गव्हर्नर्स चषक स्पर्धेत पदकाच्या फेरीत प्रवेश मिळविणारा भारताचा एकमेव मुष्टियोद्धा होता. आशिष कुमार (75 किलो), सुमित सांगवान (81 किलो) यांना या स्पर्धेतून लवकर बाहेर पडावे लागले हेते. अमित पांघल पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळणार असला तरी तो भारताला निश्चितच पदक मिळवून देईल, अशी अपेक्षा केली जात आहे. गेल्या तीन वर्षात त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली असून आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदके मिळविली आहेत. 2019 मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मानही त्याने मिळविला होता.