नवी दिल्ली : रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे सुरू असलेल्या गव्हर्नर्स चषक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पांघलने उपांत्य फेरी गाठत किमान कांस्यपदक निश्चित केले आहे. मात्र अन्य पाच भारतीय मुष्टियोद्धय़ांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
हरियाणाच्या अमित पांघलने 52 किलो वजन गटात स्थानिक खेळाडू तामिर गॅलानोव्हवर 5-0 अशी एकतर्फी मात करीत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. अमित हा विद्यमान आशियाई क्रीडा चॅम्पियन आहे. सुमित सांगवान (81 किलो), मोहम्मद हुसामुद्दिन (57 किलो), नमन तन्वर (91 किलो), ऑलिम्पिकला जाणारा आशिष कुमार (75 किलो), विनोद तन्वर (49 किलो) यांना मात्र लवकर स्पर्धेबाहेर पडावे लागले.