आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप : भारताची एकूण 15 पदके निश्चित
वृत्तसंस्था / दुबई
विद्यमान विजेता अमित पांघल (52 किलो) व विकास कृष्णन (69 किलो) यांच्यासह भारताच्या तीन बॉक्सर्सनी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आपापल्या गटातून उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले आहे. भारतीय बॉक्सर्सनी एकूण 15 पदके निश्चित करीत ऐतिहासिक यश मिळविले आहे.
या स्पर्धेत पदार्पण करणारा वरिंदर सिंग (60 किलो गट) यानेही उपांत्य फेरी गाठली आहे. पांघलने सलग दुसऱयांदा पदक निश्चित करताना मंगोलियाच्या खारखू एन्खमन्दाखचे कडवे आव्हान परतावून लावले. वरिंदरने फिलिपिन्सच्या जेरे सॅम्युअल डेला पुझवर 5-0 अशी मात केली आणि विकास कृष्णननेही संघर्षपूर्ण विजय मिळविताना इराणच्या मोसलेम मघसौदी मल अमिरचा 4-1 असा पराभव केला. भारताची एकूण 15 पदके निश्चित झाल्याने या स्पर्धेतील त्यांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरणार आहे. याआधी 2019 मध्ये झालेल्या मागील आवृत्तीत 13 पदके मिळवित सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविणाऱया पांघलने मंगोलियाच्या प्रतिस्पर्ध्यावर 3-2 असा विजय मिळविला. पांघलने अडखळत सुरुवात केली होती. पण नंतरच्या दोन फेऱयांत त्याने पंचेसचा सढळ व प्रभावी वापर करीत विजय खेचून आणला. त्याची उपांत्य लढत कझाकच्या साकेन बिबोसिनोव्हशी होणार आहे. 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पांघलने बिबोसिनोव्हला अंतिम लढतीत हरविले होते. विकास कृष्णनची उपांत्य लढत अग्रमानांकित व विद्यमान चॅम्पियन उझ्बेकच्या बोबो उस्मान बतुरोव्हशी होणार आहे. बतुरोव्ह हा आशियाई क्रीडा स्पर्धेचा विद्यमान चॅम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपचा कांस्यविजेताही आहे. राष्ट्रीय चॅम्पियन वरिंदरने प्रतिआक्रमणात चपळ व वेगवान हालचाली कणाऱया डेला पुझवर मात करून पदार्पणातच पदकाच्या फेरीत स्थान मिळविले. याआधी संजीत, साक्षी, जस्मिन, सिमरनजित कौर, शिवा थापा व मेरी कोम यांनीही उपांत्य फेरी गाठत पदकाच्या फेरीत स्थान मिळविले आहे. मेरी कोमचे पदक तर ड्रॉ काढल्यानंतरच निश्चित झाले होते.