केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱयाची तयारी पूर्ण, जनसेवक मेळाव्याचा समारोप : विविध मार्गावरील वाहतूक बंद
प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी बेळगाव दौऱयावर येणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पांसह निम्मे मंत्रीमंडळ बेळगावात येणार आहे. अमित शहा यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रविवारी अमित शहा बेळगाव, बागलकोट येथे विविध कार्यक्रमांत भाग घेणार आहेत.
बंदोबस्तासाठी 15 एसपींसह, 53 डीएसपी, 118 सीपीआय, 235 पीएसआय, 350 एएसआय, 2380 हून अधिक पोलीस व हवालदार अशी साडेतीन हजारांहून अधिक पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
अमित शहा यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, गोविंद कारजोळ, गृहमंत्री बसवराज बोम्मई, जगदीश शेट्टर, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, उमेश कत्ती, प्रभू चव्हाण, बी. सी. पाटील, व्ही. सोमन्ना, नारायणगौडा आदी मंत्री बेळगावला येणार आहेत.
भाजपचे कर्नाटकाचे प्रभारी अरुणसिंग हे ही बेळगावला येणार आहेत. शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱयाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या आधीच्या कार्यक्रमात बदल झाल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱयातील तपशीलानुसार रविवारी सकाळी 10.15 वाजता अमित शहा सांबरा विमानतळावर येणार आहेत. तेथून हेलिकॉप्टरने करकलमट्टी (ता. बदामी, जि. बागलकोट) येथे होणाऱया मुरगेश निराणी यांच्या साखर कारखान्याच्या कार्यक्रमात ते भाग घेणार आहेत. हेलिकॉप्टरने दुपारी 1 वाजता अमित शहा व मुख्यमंत्री येडियुराप्पा बेळगावला येणार आहेत. सर्किट हाऊसला पोहोचल्यानंतर 1.15 ते 3.15 हे दोन तास राखीव ठेवण्यात आले आहेत.
दुपारी 3.30 वाजता दिवंगत केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या संपिगे रोडवरील निवासस्थानी अमित शहा व मुख्यमंत्री भेट देणार आहेत.
तेथून 4.10 वाजता जिल्हा क्रीडांगणावर होणाऱया जाहीर सभेत ते भाग घेणार आहेत. 5.40 वाजता जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये होणाऱया ऍडव्हान्स सिम्युलेशन सेंटरच्या उद्घाटन समारंभात ते भाग घेणार आहेत.
सायंकाळी 6.15 ते 7.15 या दरम्यान केएलई शतमानोत्सव भवनमध्ये होणाऱया भाजप पदाधिकाऱयांच्या बैठकीत ते भाग घेणार आहेत. रात्री 8 वाजता विशेष विमानाने ते नवी दिल्लीला रवाना होणार आहेत. गृहमंत्र्यांच्या आदीच्या कार्यक्रमात थोडासा बदल करण्यात आला आहे. जनसेवक मेळाव्याच्या समारोप समारंभासाठी जिल्हा क्रीडांगणावर सर्व तयारी पूर्ण झाली असून भाजप नेत्यांनी शनिवारी सायंकाळी क्रीडांगणाला भेट देवून तयारीची पाहणी केली आहे.
वाहतूक मार्गात बदल
अमित शहा यांच्या बेळगाव दौऱयाच्या पार्श्वभूमीवर अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. जिल्हा क्रीडांगणाकडे जाणाऱया वेगवेगळय़ा मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच जनसेवक मेळाव्यासाठी येणाऱया भाजप कार्यकर्त्यांची वाहनेही वेगवेगळय़ा मार्गावरुन वळविण्यात येणार आहेत. खासकरुन कित्तूर चन्नम्मा सर्कलपासून केएलई इस्पितळाकडे जाणाऱया मार्गावरील सर्व प्रकारची वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासूनच बंदी असणार आहे.