नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंदीय गृहमंत्री अमित शहा यांना सोमवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजता येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या रूग्णालयात (एम्स) हलविण्यात आले आहे. आठच दिवासांपूर्वी ते कोरोनाच्या व्याधीपासून मुक्त झाले होते. मात्र, त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्वरित रूग्णालयात नेण्यात आले. सध्या ते डॉक्टरांच्या निरीक्षणात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली.
उत्तर प्रदेशचे कुटुंब कल्याण मंत्री अतुल गर्ग यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या तीन दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. 15 ऑगस्टला आपली चाचणी करण्यात आली होती. पण लागण नसल्याचे दिसून आले. मात्र 16 ऑगस्टच्या चाचणीत संसर्ग आढळून आला. त्यामुळे 16 पासून आजपर्यंत आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.