भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी प्रयत्न करणार
प्रतिनिधी /पणजी
भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवार दि. 30 जानेवारी रोजी गोव्यात येणार असून ते बंडखोरांना थंडोबा करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. शिवाय ते राज्यातील भाजपच्या सर्व उमेदवारांना भेटणार असून मतदारांशी सभेतून आभासी पद्धतीने संपर्क साधणार आहेत.
ऑनलाईन पद्धतीने ते डिजिटल व इतर माध्यमातून एकाचवेळी गोव्यातील 40 मतदारसंघातील मतदारांशी संवाद करणार आहेत. प्रत्येक मतदारसंघातून पाच ठिकाणी शहा यांची सभा ऐकण्याची व्यवस्था भाजपतर्फे करण्यात येणार असून गोव्यात जाहीर सभा, रोड शो यांना बंदी घालण्यात आल्याने ऑनलाईन माध्यमाच्या वापर करण्यात येणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. शहा यांचा हा गोवा दौरा भाजपसाठी लाभादायक ठरणार असून गोव्यातील बंडखोरीच्या समस्या सोडविण्यात ते यशस्वी ठरतात की नाही ते कळणार आहे.
सध्या कोरोनाचे संकट चालू असून त्याची मार्गदर्शक तत्वे पाळून नवीन तंत्रज्ञाच्या सहकार्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी मार्ग निवडले आहेत. बंडखोरीची समस्या सोडविण्यासाठी शहा यांचा हातखंडा असून ते त्या हेतूने प्रयत्न करतील आणि प्रमुख बंडखोरांना भेटतील, असा अंदाज आहे.