काँग्रेसकडून पंजाबमधील 86 उमेदवार जाहीर
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तारुढ काँग्रेसने 86 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे पुन्हा एकदा चमकौर साहिब येथून विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून निवडणुकीच्या मैदानात उतरतील. याचबरोबर अभिनेता सोनू सूदची बहिण मालविका यांना काँग्रेसने मोगा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे.
उमेदवारांच्या यादीत उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा आणि ओ.पी. सैनी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची नावे सामील आहेत. रंधावा हे स्वतःचा पारंपरिक मतदारसंघ डेरा बाबा नानक तर सैनी हे अमृतसर मध्य मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार प्रताप सिंह बाजवा यांना कादियान मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहेत.
पंजाबच्या सर्व 117 विधानसभा मतदारसंघांसाठी 14 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. पंजाबमध्ये निवडणुकीसाठी 21 जानेवारी रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 28 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील तर 31 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. पंजाबच्या 117 पैकी 34 जागा या राखीव आहेत.
पंजाब विधानसभेचा कार्यकाळ 27 मार्च रोजी समाप्त होणार आहे. राज्यातील सत्ता वाचविण्यासाठी काँग्रेस मुख्यमंत्री चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करत आहे. तर राज्यात काँग्रेससमोर आम आदमी पक्षाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अकाली दलाने बसपसोबत आघाडी करत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे.