टेक्सासमध्ये वीजपुरवठा ठप्प -21 जणंचा मृत्यू : लसीकरण केंद्रेही बंद करणे भाग
वृत्तसंस्था/ टेक्सास
अमेरिका सध्या ऐतिहासिक हिमवादळाचा तडाखा झेलत आहे. या हिमवादळामुळे लाखो लोक घरात कैद झाले आहेत. कोरोनाची लसीकरण केंद्रेही बंद करावी लागली आहेत. प्रशासनानुसार टेक्सास, लुइसियाना, केंटकी आणि मिसौरीमध्ये किमान 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
हिमवादळामुळे ऊर्जानिर्मिती क्षमतेवर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. यामुळे उत्तर डकोटापासून ओक्लाहोमापर्यंत 14 राज्यांमध्ये वीजेची समस्या निर्माण झाली आहे. तेथे ऊर्जा आणीबाणी लागू करावी लागली आहे. सर्वात वाईट स्थिती टेक्सासची असून तेथे सुमारे 25 लाख लोकांना कडाक्याच्या थंडीत विजेशिवाय रहावे लागत आहे.
हवामान सेवेनुसार चालू आठवडय़ात तरी स्थिती सुधारण्याची अपेक्षा नाही. टेक्सासमध्ये 10 लाख बॅरेल कच्चे तेल आणि 10 अब्ज घन फूट वायूचे उत्पादन पाईपलाइन्स गोठल्याने बंद करण्यात आले आहे. स्थिती अत्यंत अवघड असल्याचे अमेरिकेच्या फेडरल एनर्जी रेग्युलेटरी अथॉरिटीने म्हटले आहे. तर संकटकाळात प्रभावित प्रांतांना मदत करण्यासाठी तयार असल्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.
ऊर्जा आणीबाणीची घोषणा
ह्यूस्टन क्षेत्रात ब्लॅकआउट झाला आहे. इलेक्ट्रिक रिलायबिलिटी कौन्सिल ऑफ टेक्सासने मागणीनुसार वीज पुरवठा करणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. संबंधित संस्थेने आपत्कालीन स्थितीचा तिसऱया पातळीवरील इशारा दिला आहे. तर मेक्सिकोतही 47 लाख लोक 14 तासांपर्यंत अंधारात राहिले आहेत. ब्लॅकआउट्सची स्थिती यापुढेही राहू शकते असे संस्थेच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
संकट वाढणार
नॅशनल वेदर सर्व्हिसने दक्षिणपूर्व टेक्सासमध्ये हिमवादळाचा इशारा दिला आहे. अशा स्थितीत काळजी न घेतल्यास हायपोथर्मिया किंवा मृत्यूही होऊ शकतो. हिमवादळाची स्थिती आर्क्टिक ब्लास्टमुळे निर्माण झाली आहे. आर्क्टिकमधून येणारे वारे दक्षिणेच्या दिशेने वाहत आहेत. याचमुळे फेब्रुवारी महिना मागील 122 वर्षांमधील सर्वात थंडीचा ठरला आहे. बुधवारी आणखीन एक हिमवादळ धडकण्याची शक्यता होती.