वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत अमेरिकेची सेरेना विल्यम्स, स्पेनची गार्बिन मुगुरुझा यांनी महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली तर सेरेनाची बहीण व्हीनस विल्यम्स आणि दीर्घ काळानंतर पुनरागमन करणारी बेल्जियमची किम क्लिस्टर्स यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. पुरुष एकेरीत अँडी मरेने पाच सेट्सच्या झुंजार लढतीत विजय मिळविला तर डॉमिनिक थिएमनेही दुसरी फेरी गाठली आहे. भारताच्या सुमित नागलनेही दुसऱया फेरीत स्थान मिळविले आहे.
24 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या मार्गावर असणाऱया 38 वर्षीय सेरेनाने पहिल्या सामन्यात क्रिस्टी ऍनचा 7-5, 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेत तिने याआधी सहावेळा जेतेपद मिळविलेले आहे. मात्र 2017 मधील ऑस्ट्रेलियन ओपननंतर तिला एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही. स्पेनच्या मुगुरुझाने दुसरी फेरी गाठताना जपानच्या नाओ हिबिनोचा 6-4, 6-4 असा पराभव करून पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. सेरेनाची मोठी बहीण व्हीनसला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. तिला झेकच्या मुचोव्हाने 6-3, 7-5 असे नमविले. निवृत्तीनंतर दुसऱयांदा पुनरागमन करणाऱया व आठ वर्षांत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅममध्ये खेळणाऱया क्लिस्टर्सला पराभूत व्हावे लागले. रशियाच्या अलेक्झांड्रोव्हाने तिचे आव्हान 3-6, 7-5, 6-1 असे संपुष्टात आणले.
पुरुष एकेरीत अँडी मरेला मात्र विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्याने जपानच्या योशिहितो निशिओकावर रोमांचक लढतीत 4-6, 4-6, 7-6 (7-5), 7-6 (7-4), 6-4 अशी मात करून दुसरी फेरी गाठली.
त्याची लढत कॅनडाच्या फेलिक्स ऑगर ऍलासिमेशी होईल. दुसऱया मानांकित डॉमिनिक थिएमने जॉम मुनारविरुद्ध 7-6 (8-6), 6-3 असे दोन सेट्स जिंकून आघाडी घेतली असताना मुनारने सामना सोडून दिल्याने थिएमला दुसऱया फेरीत स्थान मिळाले.
सुमित नागलचे ग्रँडस्लॅममध्ये पहिले यश
सुमित नागलने आजवरच्या कारकिर्दीत ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसऱया फेरीत पहिल्यांदाच प्रवेश मिळविला आहे. त्याने अमेरिकेच्या ब्रॅडली क्लाहनचा 6-1, 6-3, 3-6, 6-1 असा सुमारे सव्वादोन तासाच्या लढतीत पराभव केला. मागील वर्षी याच स्पर्धेत नागलने पहिल्या फेरीतील सामन्यात रॉजर फेडररविरुद्ध एक सेट जिंकण्याचा पराक्रम केला होता. नागलची दुसऱया फेरीत डॉमिनिक थिएमशी लढत होणार आहे.