कंपनीची नोंदणी बेंगळूरमध्ये : संशोधन-विकासावर देणार भर
बेंगळूर ः अमेरिकन कंपनी आणि जगातील धनाढय़ामध्ये नुकतेच सर्वोच्च स्थान पटकावलेल्या एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने भारतामध्ये प्रवेश केला आहे. ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्मिती करणारी कंपनी आहे. टेस्लाने भारतामध्ये आपल्या उत्पादन युनिटची नोंदणी केली आहे. टेस्ला इंडिया मोर्ट्स ऍण्ड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला बेंगळूर येथे नोंदणीकृत करण्यात आले आहे. याचठिकाणी कंपनी एक संशोधन, विकास युनिटसह उत्पादन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
टेस्ला भारतामध्ये लक्झरी इलेक्ट्रिक कारची निर्मिती आणि व्यवसाय करणार असून भारतामध्ये मॉडेल 3 लाँच करण्याचे संकेत आहेत. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बीएस येडियुरोप्पा यांनी टेस्ला कंपनीचे स्वागत केले आहे. टेस्लाचा नोंदणी क्रमाक 142975 आहे. वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेंस्टीन हे संचालक म्हणून कार्यरत राहणार आहेत. तनेजा या सीएफओ म्हणून पदभार सांभाळणार असल्याची माहिती आहे.
एलॉन यांची माहिती
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी मागील वर्षात ऑक्टोबरमध्ये ट्वीट करुन कंपनी 2021 मध्ये भारतामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती. भारतामध्ये मागच्या वर्षी प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते, परंतु दरम्यानच्या काळात कोरोना संकट आणि अन्य कारणामुळे नियोजन पूर्णपणे कोलडमडल्याने हा प्रवेश लांबणीवर पडल्याचे पहावयास मिळाले आहे.