ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिकेन कंपनी ‘KKR’ ने रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 11 हजार 367 कोटींची गुंतवणूक केली आहे. या कंपनीची जिओमध्ये 2.23 टक्के भागीदारी असेल. रिलायन्सने जिओने याबाबतची घोषणा केली आहे.
जिओ प्लॅटफॉर्मचा KKR सोबतचा हा पाचवा मोठा करार आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये फेसबुक, सिल्वर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स आणि जनरल अटलांटिक या मोठ्या कंपन्यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. फेसबुकने 43,534 कोटींची गुंतवणूक करत जिओमध्ये 9.9 टक्के भागीदारी निश्चित केली आहे. तर सिल्वर लेकने जिओमध्ये 5655 कोटींची गुंतवणूक करत 1.55 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सने 11,367 कोटी आणि जनरल अटलांटिकने साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.
फेसबुक, सिल्वर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक आणि केकेआर या पाच कंपन्यांसोबतच्या करारामुळे रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 78, 562 कोटी रुपये जमा झाले आहेत. केकेआरच्या 11,367 कोटींच्या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्यू 4.91 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइज व्हॅल्यू 5.16 लाख कोटी होईल, असे जिओकडून सांगण्यात आले आहे.