कोलकाता
आयपीएल इतिहासात एखाद्या प्रँचायझीशी करारबद्ध होणारा पहिला अमेरिकन खेळाडू, मध्यमगती गोलंदाज अली खान यंदाच्या हंगामासाठी शनिवारी संयुक्त अरब अमिरातीत दाखल झाला. अली खान येथे कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने इन्स्टाग्रामवर व्हीडिओ पोस्ट करत त्यात अली खान दाखल झाल्याची माहिती नमूद केली. आमचा आणखी एक ‘नाईट’ कुटुंबात दाखल झाला आहे, असे ते म्हणाले. कोलकाता नाईट रायडर्सने इंग्लिश सीमर हॅरी गर्नी दुखापतग्रस्त झाल्यानंतर 29 वर्षीय अली खानला गत आठवडय़ातच करारबद्ध केले आहे. अली प्रतितास 140 किमी वेगाने गोलंदाजी करण्यात माहीर असून स्काऊट हंगामात भेदक यॉर्कर्सचा मारा करत त्याने अवघ्या क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले होते. अलीकडेच संपन्न झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाने जेतेपद संपादन केले, त्यात अली खानचा समावेश होता. केकेआर व ट्रिनबॅगो नाईट रायडर्स हे दोन्ही संघ शाहरुख खानच्या मालकीचे आहेत.