वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
2020 सालातील अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा प्रेक्षकविना खेळविली जाणार असल्याची माहिती अमेरिकन टेनिस संघटनेने दिली आहे. कोरोना महामारी संकटामुळे संघटनेला वरील निर्णय घ्यावा लागला. तसेच अमेरिकेतील कोरोना महामारी परिस्थिती अद्याप आटोक्यात नसल्याने टेनिस क्षेत्रातील काही आघाडीच्या टेनिसपटूंनी या स्पर्धेबाबत चिंता व्यक्त केली असून आपल्या सहभागाविषयी साशंकता व्यक्त केली आहे.
कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने जवळपास गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीतील एटीपी टूर आणि डब्ल्यूटीए सर्कीटमधील सर्व टेनिस स्पर्धा तहकूब किंवा रद्द केल्या होत्या. न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा 31 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर दरम्यान होणार असून या स्पर्धेची औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल. या स्पर्धेच्या नव्या आराखडय़ाला एटीपी आणि डब्ल्यूटीएकडून लवकरच अधिकृत मान्यता दिली जाईल, असे विश्वसनीय गोटातून सांगण्यात आले.
अमेरिकन टेनिस संघटनेने या महत्त्वाच्या ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेसंदर्भात पुरूष आणि महिलांच्या टूरबरोबर करार केला असल्याचे समजते. आता या स्पर्धेला स्थानिक आरोग्य विभागाकडून हिरवा कंदील मिळण्यासाठी अमेरिकन टेनिस संघटना प्रतिक्षेत आहे. पूर्वी ठरल्याप्रमाणेच अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या तारखा कोणताही बदल करण्यात आलेला नाही पण सदर स्पर्धा प्रेक्षकविना खेळविली जाणार आहे.