कॅलिफोर्नियातून मुंबईत येऊन लग्न, मित्रांसोबत परतीच्या प्रवासात कोरोनाचे विघ्न
राजीव पडवळ / देवगड:
लग्न करण्यासाठी जानेवारीमध्ये आम्ही कॅलिफोर्नियाहून भारतात आलो होतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईत विवाह बंधनात अडकलो अन् मुंबईहूनच पुन्हा कॅलिफोर्नियाला पुन्हा निघालो. कॅलिफोर्नियाचं आगाऊ रिटर्न बूकिंग होतं आमचं. तेही ‘व्हाया चीन!’ पण, कोरोनासारख्या महाभयंकर ‘व्हायरस’चा चीनला विळखा असताना आम्हाला ‘व्हाया चीन’ पाठवण्यास नातेवाईक तयारच नव्हते. अखेर, मुंबईहून थेट यू. एस. ए. चे विमान तिकिट मिळाले. प्रवास सुरू झाला.
यू. एस. ए. च्या विमानतळावर उतरलो व कोरोनाचा संकट अमेरिकेतही डोकावल्याचं आम्हाला समजलं. विमानतळावरच वैद्यकीय तपासणी करून, ‘ट्रव्हल हिस्ट्ररी’ नोंदवून आम्ही कॅलिफोर्नियाच्या मुक्कामी पोहोचलो. पण, अवघ्या जगाला आपल्या कवेत घेऊ पाहणाऱया या कोरोना व्हायरसची दहशत संसाराच्या नव्या पाऊलवाटेवर आम्ही आजही अनुभवत असल्याचे देवगड येथील कॅलिफोर्नियास्थित नवदाम्पत्य सुशांत सुनील कुळकर्णी व सौ. ईशा सुशांत देशपांडे-कुळकर्णी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
देवगड येथील कुळकर्णी उद्योग समूहाचे सुनील कुळकर्णी यांचा मुलगा सुशांत हा नोकरीनिमित्त सख्खा भाऊ सोहम, सख्खा चुलत भाऊ कौस्तुभ कुळकर्णी, मैत्रीण शिवानी ईनामदार व ईशा देशपांडे यांच्यासमवेत सुमारे चार वर्षांपासून अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात ‘सान्टा क्लारा’ शहरात राहतो. सुशांत व ईशा यांच्या प्रेमविवाहाची तारीख ठरल्याने हे सर्वजण लग्नापूर्वी काही दिवसांच्या फरकाने भारतात आले होते. या दरम्यान, कोरोना व्हायरसने आपले जाळे चीन देशाच्या बाहेरही विणण्यास सुरुवात केली होती. फेब्रुवारीमध्ये सुशांत व ईशाचा विवाह मुंबईमध्ये झाला. या नवदाम्पत्यासह दोन भाऊ व एका मैत्रिणीचे कॅलिफोर्निया रिटर्न तिकिट फेब्रुवारीच्या दुसऱया आठवडय़ातच आगाऊ बूक करण्यात आले होते. मात्र, हे विमानाचे तिकिट ‘व्हाया चीन’ असल्याने सुशांतच्या नातेवाईकांनी ते तात्काळ रद्द करीत थेट यू. एस. चे बूकिंग केले. मुंबईहून नवदाम्पत्यासह सुशांतचे दोन्ही भाऊ व त्यांची मैत्रीण हे सर्व यू. एस. च्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथे गेल्यानंतर कोरोनाविषयी तेथील सरकारने घेतलेली खबरदारी विमानतळावर त्यांना दिसून आली. थर्मल स्क्रिनिंग व ट्रव्हल हिस्ट्री नोंदवून घेतल्यानंतर त्या सर्वांना कॅलिफोर्नियाला जाण्याची परवानगी मिळाली. कॅलिफोर्नियाच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर सुमारे दहा दिवसांनी तेथील शासनाच्या आरोग्य विभागाकडून त्यांची आरोग्यविषयक विचारपूस करण्यात आली. तसेच कोरोनाविषयक खबरदारी घेण्याची सूचनाही करण्यात आली.
टप्प्याटप्प्याने कॅलिफोर्नियामध्ये लॉकडाऊन
सुशांत व सौ. ईशा म्हणाले, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यामध्येही कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सध्या 7 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत आहे. चार दिवसांपूर्वी कॅलिफोर्निया राज्यामध्ये तब्बल 16 हजार 500 कोरोनाग्रस्त होते. कोरोनाबाधित रुग्णाला ‘फर्स्ट ट्रिटमेंट’ दिल्यानंतर त्याला ‘होम क्वारंटाईन’ करण्यात येते. मात्र, एखाद्या रुग्णाला श्वसनाचा त्रास होऊ लागला, तरच त्याला ‘हॉस्पिटॅलाईज’ केले जाते. आतापर्यंत येथे कोरोनाबाधित जेवढे मृत्यूमुखी पडले आहेत, त्यात ‘सिनियर सिटीजन’ अधिक प्रमाणात आहेत.
कर्तव्याची जाणीव आवश्यक
कौस्तुभ म्हणाला, येथे लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर काही प्रमाणात गर्दी होत असली, तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. कामाव्यतिरिक्त कुणीही घराबाहेर पडत नाहीत. कर्तव्याची जाणीव ठेवूनच घराबाहेर आले पाहिजे, असा सल्ला त्याने भारतीयांना दिला.
‘टेन्ट’ उभारून छोटय़ा हॉस्पिटलांची निर्मिती
शिवानी ईनामदार म्हणाली, अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वोच्च आहे. तेथील माझी एक सहकारीही कोरोनाबाधित झाली आहे. अमेरिकेच्या शासनाकडून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी तेथील नामांकित ‘सेंट्रल पार्क’सारख्या ठिकाणीही टेन्ट उभारून छोटय़ा हॉस्पिटलांची निर्मिती केली गेली आहे.
घरीच काम करण्याची मुभा
सोहम म्हणाला, आम्ही सर्वजण आयटी क्षेत्राशी निगडीत असून सर्व वेगवेगळय़ा आयटी कंपन्यांमध्ये नोकरीस आहोत. आमच्या कंपन्यांनी आम्हाला घरीच बसून काम करण्याची मुभा दिली आहे. आठवडय़ातील सोमवार ते शुक्रवार हे दिवस कंपनीच्या कामातच निघून जातात. लॉकडाऊन असल्यामुळे उरलेल्या दोन दिवसांत आम्ही विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, चित्रपट, पेन्टींग यात दिवस रमवतो. ऑनलाईन शॉपिंगही येथे सुरक्षितरित्या सुरू असल्याने त्याचाही लाभ आम्ही घेतो.
खरंच ‘इंडिया इज ग्रेट’!
कोरोनाची ही साखळी तोडायची असेल, तर लॉकडाऊन प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी भारताने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन घेतलेली खबरदारी, तेथील उपाययोजना वाखाणण्याजोग्या आहेत. अमेरिका हा देश महासत्ता म्हणून भुषविला जात असला, तरी सध्याच्या काळात जागतिकस्तरावर ‘इंडिया इज ग्रेट’ असेच म्हणावे लागेल, असे सुशांत म्हणाला.