अर्टेमिस-1 यानाचे यशस्वी प्रक्षेपण, चंद्रावर यंत्रमानव संचार करणार
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेच्या केप कॅनाव्हेरल येथील केनेडी अवकाश केंद्रावरून नासाने अर्टेमिस-1 या आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आता हे यान पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत चंद्राच्या कक्षेत प्रवेशण्यास सज्ज झाले आहे. या यानात यांत्रिक वाहन असून ते चंद्रावर संचार करणार आहे. चंद्रावरील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेने नव्याने हे चांद्र अभियान हाती घेतले आहे. पाच दशकांच्या कालावधीनंतर अमेरिका पुन्हा चंद्र धुंडाळण्यास सज्ज आहे.
अर्टेमिस-1 या यानाला अवकाशात पोहोचविण्याचे कार्य ओरिऑन या अवकाश वाहनाने केले. यानाचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुखरूप सुरू असून आतापर्यंत कोणतीही अडचण आलेली नाही, असे नासाने प्रक्षेपणानंतर काही तासांनी घोषित केले. बऱयाच विलंबानंतर हे अभियान अखेर साकारले आहे. अनेक अडचणी आल्याने हा उपक्रम अनेक वर्षे पुढे ढकलावा लागला होता. तसेच खर्चाच्या दृष्टीनेही तो बोजड असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले होते. तथापि, नासाने निर्धाराने तो मार्गी लावला असून चंद्रावर पुन्हा एकदा मानव पाठविण्याच्या अमेरिकेच्या अभियानाची पूर्वतयारी म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. यान घेऊन जात असलेले यांत्रिक वाहन चंद्रावर पोहोचण्यास तीन आठवडय़ांचा वेळ लागणार आहे. मध्ये कोणतीही अन्पेक्षित अडचण न आल्यास ही मोहीम यशस्वी होईल, असा संशोधकांना विश्वास आहे. यापूर्वी अमेरिकेने अपोलो नामक चांद्र अभियान चालविले होते. अपोलो ही ग्रीक पुराणातील देवता आहे. अनेक दशकांनी याच अपोलोच्या जुळय़ा बहिणीच्या नावाने म्हणजेच अर्टेमिस-1 या नावाने नवे अभियान सुरू झाले आहे.