ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
फायझरच्या लसीनंतर अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशनने मॉडर्नाच्या लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच फायझर लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी मिळाली असून, सध्या अमेरिकेत फायझरच्या लसीचे डोस डॉक्टर, आरोग्य सेवक तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे. आता मॉडर्नाच्या लसीला मान्यता मिळाल्याने ही लसही उपलब्ध झाली आहे.
मॉर्डनाची लस मानवी चाचणीमध्ये 95 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. तिसऱ्या टप्प्यात 30 हजार स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी घेण्यात आली. कोरोनापासून संरक्षण देण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यात ही लस यशस्वी ठरली. आठवडाअखेरीस अमेरिकेत 50 लाखापेक्षा जास्त लसीच्या डोसचे वितरण होणार आहे. मॉडर्नाची लस हाताळायला तसेच वापरायला सोपी आहे. कारण या लसीला फायझर लशीसारखे -75 डिग्री सेल्सीयस तापमानामध्ये ठेवण्याची गरज भासत नाही.